WorldCup 2023 IND VS SA – कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा 37 वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) यांनी झंझावाती सुरुवात केली. दोघांनी 35 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली. या भागीदारीसह रोहित आणि शुभमनने भारतासाठी एक खास विक्रम केला. यासोबतच साऊथ आफ्रिकेच्या रबाडाच्या (Rabada) नावे देखील एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जॅनसेन पहिल्या पॉवरप्लेमध्ये म्हणजे पहिल्या 10 षटकांमध्ये एकही विकेट घेऊ शकला नाही. यानसेनला पहिल्या 10 षटकांत एकही विकेट घेता आली नसल्याची या विश्वचषकात ही पहिलीच वेळ आहे. यानसेनने या विश्वचषकात आतापर्यंत सात सामन्यांत 16 बळी घेतले आहेत.याउलट रबाडाने हिटमॅन रोहितला तंबूत पाठवत एक आगळावेगळा रेकॉर्ड आपल्या नावे केला. (Rabada out rohit sharma 12th time)
रबाडाने हिटमनला बाद करून विक्रम केला
रबाडा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माला सर्वाधिक वेळा बाद करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने तिन्ही फॉरमॅट एकत्र करून तब्बल 12 वेळा रोहितला बाद केले आहे. टीम साऊदी 11 वेळा हा कारनामा करत दुसऱ्या स्थानी आहे. तर अँजेलो मॅथ्यूज १० गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. नॅथन लायनने रोहितला नऊ वेळा तर ट्रेंट बोल्टने रोहितला आठ वेळा बाद केले आहे.
एका वर्षातील सर्वोच्च ओपनिंग धावा
या वर्षी म्हणजे 2023 मध्ये आतापर्यंत भारताने वनडेमध्ये पहिल्या विकेटसाठी 2019 धावा केल्या आहेत. रोहित-शुबमनच्या योगदानाशिवाय इशान किशनसह इतर फलंदाजांनीही यात मोलाचे योगदान दिले आहे. एका वर्षात भारताने सलामीच्या विकेटसाठी केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. यापूर्वी 1998 मध्ये भारताने एकदिवसीय सामन्यात पहिल्या विकेटसाठी 2002 धावा केल्या होत्या. तर 2002 मध्ये 1702 धावा झाल्या होत्या.
दुसरा वेगवान 50 धावा
रोहित-शुबमनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झंझावाती सुरुवात केली. भारताने अवघ्या 4.3 षटकात 50 धावा पूर्ण केल्या होत्या. या विश्वचषकात कोणत्याही संघाने सर्वात जलद 50 धावा पूर्ण करण्याचा हा दुसरा विक्रम आहे. धर्मशाला येथे न्यूझीलंडविरुद्ध 4.1 षटकात ५० धावा पूर्ण करणाऱ्या भारतापेक्षा ऑस्ट्रेलिया पुढे आहे. रोहितने 24 चेंडूत 40 धावांची खेळी खेळली. आपल्या खेळीत त्याने सहा चौकार आणि दोन षटकार मारले. त्याला कागिसो रबाडाने टेंबा बावुमाच्या हाती झेलबाद केले.