India vs Australia 3rd T20 Match Result : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. हा सामना बारसापारा स्टेडियम, गुवाहाटी येथे झाला. ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 222 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर धावसंख्येचा पाठलाग केला.
ग्लेन मॅक्सवेलने गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या T20 मध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. मॅक्सवेलने अवघ्या 48 चेंडूत 8 चौकार आणि 8 षटकारासह नाबाद 104 धावा करत गमावलेला सामना ऑस्ट्रेलियाला जिंकून दिला. चौकार मारून मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय टी-२० मधील चौथे शतक पूर्ण केले. त्याने 47 चेंडूत शतक झळकावले. मॅक्सवेल आता रोहित शर्मासह T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला आहे.
तर दुसरीकडे भारताच्या प्रसिध कृष्णाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात 4 षटकात तब्बल 68 धावा दिल्या. त्याला एकही बळी मिळवता आला नाही. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात एका स्पेलमध्ये सर्वाधिक धावा देण्याचा नकोसा विक्रम कृष्णाच्या नावावर नोंदला गेला आहे. याआधी हा विक्रम फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलच्या नावावर होता. चहलने 2018 मध्ये सेंच्युरियन मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 षटकात एकूण 64 धावा दिल्या होत्या आणि एकही विकेट घेतली नव्हती.
IND vs AUS 3rd T20 : टीम इंडियाच्या पराभवाची ‘ही’ आहेत 5 मोठी कारणे
या मालिकेत भारत 2-1असा आघाडीवर आहे. चौथा टी-20 सामना रायपूरमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाला मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे. मात्र, या दोन्ही सामन्यांत मार्कस स्टोनिस, ग्लेन मॅक्सवेल, जोस इंग्लिस मायदेशी परतत असल्याने खेळणार नाहीत.