पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेय

पुणे – शहरातील विविध भागात 4 जणांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली असून अन्य साथीदारांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खडकी येथे एकावर जीवघेणा हल्ला
खडकी येथे एकावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी संतोष बाळासाहेब दुर्वे (रा. पिंपळे-गुरव) याला खडकी पोलिसांनी अटक केली असून त्याच्या एका साथीदाराविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी बब्बा राजोडीया (वय 56, रा. खडकी रेल्वे स्टेशन रोड) हे त्यांच्या घरी धुणी-भांडी करणाऱ्या महिलेच्या घरी निरोप देण्यास गेले होते. तिला उद्या लवकर कामाला ये असे सांगून ते परतत होते. यावेळी संतोष दुर्वे यांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. ते प्रतिकार करत असताना त्याने जवळील चाकूसारख्या धारदार शस्त्राने त्यांच्या मानेवर वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एच.आर.ठाकूर तपास करत आहेत.

दोघांवर कोयत्याने वार करून महिलेस मारहाण
पूर्व वैमनस्यातून एका कुटुंबातील दोघांवर कोयत्याने वार करून महिलेला लाथा-बुक्‍क्‍याने मारहाण करण्यात आली. ही घटना कोंढवा बुद्रुक येथे घडली.

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तैसीफ मेहबुब शेख (वय 28), सद्दाम खुदबुदीन शेख(वय 21), शोएब मुनाफ शेख(वय 22), मोहसीन मेहबुब शेख(वय30), मोहंमद मेहबुब शेख(वय22 ) यांना अटक केली आहे. तर त्यांच्या इतर एका साथीदारावर गुन्हा दाखल केला गेला आहे.

फिर्यादी बरकत खान(45,रा.आज्ञफ नगर, कोंढवा-बुद्रुक) यांचा भाचा सोहेल याच्याबरोबर आरोपींची पुर्वी भांडणे झाली होती. या भांडणाचा बदला म्हणून आरोपींनी फिर्यादीच्या डोक्‍यात कोयत्याने वार करुन जखमी केले. तसेच सोहेबच्या हातावरही कोयत्याने वार केले. यानंतर त्यांच्या बहिणीस लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस.काळे करत आहेत.

तक्रारीचा राग मनात धरुन डोक्‍यात दगड घातला
पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून एका तरुणाच्या डोक्‍यात दगड घालून त्याला धमकी देण्यात आली. ही घटना औंध गावाजवळ दोन दिवसापुर्वी घडली. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी लक्ष्मण जाधव( 26,रा.औंध गाव)हे मित्र शिवकुमार देशपांडे यांच्यासह दुचाकीवरून जात होते. यावेळी आरोपींनी त्यांना रस्त्यात गाठत तक्रार दाखल केल्याचा जाब विचारला. यानंतर त्यांच्या डोक्‍यात दगड घालून पाहून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही.एम.कोळी करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.