नव्या रुग्णांचे प्रमाण 20 टक्के
पुणे – शहरात करोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेकडून शहरात करण्यात येणाऱ्या एकूण चाचण्यांच्या तुलनेत नव्याने बाधित सापडणाऱ्या रुग्णांचा आकडा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तब्बल 20.6 टक्के झाला आहे.
त्यामुळे हा वाढता आकडा कमी करण्यासाठी प्रशासनाकडून बाधितांच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तीचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यावर भर देण्यात येत आहे. महापालिकेकडून जून महिन्यात सापडलेल्या रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले असून त्यातून ही बाब समोर आली आहे.
शहरात 1 जूनपासून अनलॉक-1 ला सुरुवात झाली, त्यानंतर शहरातील वर्दळ वाढल्याने मोठ्या प्रमाणात करोनाची बाधा होत असलेले नवीन रुग्ण सापडत आहेत. हे रुग्ण वाढतानाच महापालिकेने शहरातील चाचण्यांची क्षमताही जवळपास दुप्पट केली असून जून महिन्या अखेरीस शहरात आता दिवसाला तब्बल 4200 चाचण्यांचे नमुने घेतले जात आहेत. मात्र, या चाचण्या वाढतानाच एकूण चाचण्यांच्या तुलनेत बाधित रुग्णांचा टक्का लक्षणीयरित्या वाढला आहे. 5 ते 11 जून या कालावधीत चाचण्यांच्या तुलनेत 13.3 टक्के नवे बाधित रुग्ण आढळत होते, तर 12 ते 18 जून या कालावधीत हा टक्का वाढून 15.6 टक्के झाला होता. तर 19 ते 25 जून या कालावधीत हा टक्का 16 वर गेला होता.
मात्र, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 26 जून ते 2 जुलै या कालावधीत हा 20.6 टक्के झाला आहे. तर मार्च, एप्रील आणि मे महिन्यात चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचा टक्का हा 12 ते 13 टक्के दरम्यान स्थिर होता.