दोन नगरसेवक आणि कुटुंबीयांना संसर्ग
पुणे – लष्कर परिसरात आतापर्यंत केवळ प्रतिबंधित क्षेत्रातच (कंटेन्मेंट झोन) पसरणारा करोना प्रादूर्भाव आता प्रतिबंधित क्षेत्राबाहेरही पसरू लागला आहे. वानवडी, घोरपडी भागातील रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे बोर्डाच्या चिंतेतही वाढ झाली असून, पुढील परिस्थिती हाताळण्यासाठी नेमके काय करावे? असा प्रश्न बोर्डासमोर उभा आहे.
लष्कर परिसरातील न्यू मोदीखाना, भीमपुरा, बुटी स्ट्रीट हे परिसर करोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. त्यामुळे बोर्डाने हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे. या परिसरात लॉकडाऊनचे नियम अजूनही लागू आहेत. मात्र, असे असूनही करोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे.
महत्त्वाचे म्हणजे, नव्याने दाखल होणाऱ्या बाधितांमध्ये कंटेन्मेंट क्षेत्राबाहेरील रुग्णांचाही समावेश आहे. त्यामुळे आगामी काळात कंटेन्मेंट झोनची फेररचना करण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, बोर्डाचे दोन नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांना करोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे बोर्डातर्फे सांगण्यात आले आहे.