राहुरी – मराठा आरक्षणासाठी तब्बल 16 दिवस उपोषण करणारे मनोज जरांगे सध्या राज्यभर सभा घेत आहेत. आपली भूमिका स्पष्ट करत पुढील आंदोलनाची ध्येय धोरणे ठरवत आहेत. त्यांची येत्या रविवारी (दि. 8) सकाळी 9 वाजता येथील विठ्ठला लॉन्स येथे जाहीर सभा होत आहे, अशी माहिती मराठा एकीकरण समितीतर्फे देण्यात आली आहे.
जरांगे पाटील यांनी सरकारच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले होते. 40 दिवसांत जर सरकारने आरक्षणासंदर्भात ठोस पावले उचलली नाही, तर पुन्हा मोठा लढा उभारण्यात येईल, असा इशारादेखील त्यांनी दिला होता. सध्या राज्यातील विविध भागात ते सभा व गाठीभेटी घेत आहेत. येथील विठ्ठला लॉन्स येथे मराठा एकीकरण समितीच्या सदस्यांची बैठक झाली. त्यात जरांगे पाटील यांची सभा राहुरी येथे घेण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जरांगे पाटील यांचे राहुरी येथे रविवारी आगमन होणार आहे. या वेळी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात येणार आहे.