वॉशिंग्टन – आधुनिक काळात पती आणि पत्नी दोघेही नोकरी करत असताना घराचा कारभार कोणी पहायचा याबाबत नेहमीच संघर्ष होत असतो. अनेक वेळा या कामाची जबाबदारी महिलांवर म्हणजेच गृहिणींवर येत असते.
कोणताही रोजगार न करता फक्त घर सांभाळणाऱ्या महिलांना नेहमीच होम मेकर किंवा गृहिणी म्हणून संबोधले जाते; पण आता एका नव्या रिसर्चप्रमाणे अमेरिकेत घर सांभाळणाऱ्या पुरुषांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून गृहिणींची संख्या मात्र 28% ने कमी झाली आहे.
प्यु रिसर्च या संस्थेने गेल्या 30 वर्षातील सामाजिक परिस्थितीचा आढावा घेणारे संशोधन केले असून त्यामधून हे निष्कर्ष समोर आले आहेत.
1989 ते 2021 या कालावधीतील परिस्थितीवरील हे संशोधन केले असून त्याप्रमाणे घर सांभाळणाऱ्या महिलांच्या संख्येमध्ये 26 ते 28 टक्के घट झाली असून पुरुषांच्या बाबतीत मात्र हे प्रमाण 7% ने वाढले आहे.
या निष्कर्षाप्रमाणे ज्या पुरुषांची शैक्षणिक पात्रता थोडी कमी आहे अशा पुरुषांनी घरात राहून घर सांभाळण्याचा पर्याय निवडला आहे. त्यांची सुशिक्षित पत्नी मात्र बाहेर नोकरी करत आहे. या संशोधनातील आणखीन निष्कर्ष म्हणजे सर्वसाधारणपणे ज्या घराचा कारभार पुरुष पहात आहेत त्या घरांची आर्थिक स्थिती जेमतेम आहे.
विविध कारणामुळे पुरुषांनी घराचा कारभार सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्या कारणापैकी सर्वात महत्त्वाचे कारण बेरोजगारी हेच मानले जात आहे.
म्हणजेच घरातील पुरुषाला कोणताही रोजगार उपलब्ध होत नसेल तर घर सांभाळण्याची जबाबदारी त्याने उचलली आहे. पुरूषांनी घर सांभाळण्याच्या इतर कारणांमध्ये शारीरिक व्यंग असणे, अपंगत्व असणे किंवा निवृत्त असणे ही कारणे सुद्धा समोर आली आहे.