मुंबई – जळगावच्या पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. हा मारहाणीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून या मारहाणीत संदीप महाजन हे जखमी झाले आहे. किशोर पाटील यांच्यापासून संदीप महाजन यांना आणि कुटुंबियांना धोका असल्याची तक्रार त्यांनी पोलिसात केली आहे.
काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी याच पत्रकाराला दूरध्वनीवरून शिवीगाळ करून धमकी दिली होती. पत्रकार संदीप महाजन यांच्या हल्ल्याविरोधात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मिडिया परिषदेने आमदार किशोर पाटील यांच्या मुजोरीचा तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
नेमके काय आहे प्रकरण
एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरण जळगाव जिल्ह्यात अलीकडेच घडले होते. यावरून संदीप महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्याने आमदार किशोर पाटील संतप्त झाले होते. त्यांनी पत्रकार महाजन यांना फोनवरून शिवीगाळ करून मारहाणीची धमकीही दिली होती. याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती. ही ऑडीओ क्लिप माझीच असल्याचे सांगत पाटील यांनी पत्रकाराला शिव्या दिल्याचा मला अभिमान आहे. मी माझे शब्द मागे घेणार नाही, असे म्हटले होते. त्यापाठोपाठ आता या पत्रकाराला भररस्त्यात मारहाण करण्यात आली.