नवी दिल्ली – तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षिस असलेल्या एका कट्टर माओवाद्याला पोलिसांनी अटक केली आहे. बिहारमधील गया जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक आशिष भारती यांनी याबाबतची माहिती दिली. बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) चे सदस्य असलेले प्रमोद मिश्रा आणि अनिल यादव हे दोन नक्षलवादी गया जिल्ह्यातल्या तेकारी भागामध्ये लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक पोलीस आणि “सीआरपीएफ’च्या कोब्रा बटालियनच्या संयुक्त पथकाने छापा घालून कारवाई केली, असे भारती यांनी सांगितले.
यातील मिश्रावर झारखंड पोलिसांनी तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. “सीपीआय'(माओवादी) संघटनेचा स्वयंघोषित कपॉलिटब्युरो सदस्य असलेला मिश्रा हा औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. तर यादव हा गया जिल्ह्यातल एका गावचा रहिवासी आहे, अनेक राज्यांमधील विविध गुन्ह्यांमध्ये या दोघांचीही नावे होती.
2004 मध्ये तुरुंगातून सुटल्यापासून हे दोघेही फरार होते. या दोघांनाही अमेरिकेने 2006 मध्येच “मोस्ट वॉन्टेड दहशतवादी’ म्हणून घोषित केले गेले होते. मिश्रा आणि यादव दोघेही गया जिल्ह्यात मोठ्या घातपाती कारवायांची तयारी करत होते. गयामध्ये मिश्राने चार जणांची हत्या करून त्यांचे मृतदेह झाडांना टांगून ठेवले होते. या दोघांना जराही तोला या गावातून अटक करण्यात आली, असे भारती यांनी सांगितले.