शहरातील दोघांसह तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील रुग्णसंख्या १२८ वर
सातारा (प्रतिनिधी) : सातारा शहरातील दोन व कोरेगाव तालुक्यातील एक अशा तिघांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याने शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात चार जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या १२८ वर पोहचली आहे.
जिल्हा कारागृहातील एक कैदी सकाळी पाँझिटिव्ह आला होता. सातारा शहरातील प्रतापगंज पेठेतील करोनाबाधिताच्या निकट सहवासातील म्हणून खावली येथील विलगीकरण कक्षात दाखल असलेले ४० वर्षे आणि ४७ वर्ष वयाचे दोन जण आणि मुंबईवरून प्रवास करून आलेला कोरेगाव तालुक्यातील २९ वर्षीय युवक अशा तिघांचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे. हा युवक ११ तारखेपासून करोना केअर सेंटरमध्ये होता. या तिघांचे अहवाल करोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.२९ वर्षीय युवक विनापरवानगी मुंबई येथून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करुन करोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.
आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या १२८ झाली असून या पैकी ६५ जणांवर उपचार सुरु आहेत तर ६१ जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.