वॉशिंग्टन: अमेरिकेत करोनावर जे संशोधन होत आहे त्याची माहिती चीनकडून आमचे संगणक हॅक करून चोरली जात आहे, असा आरोप अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याला एफबीआय आणि अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ होमलॅंड सिक्युरिटी यांनीही दुजोरा दिला आहे.
चीनच्या सत्ताधारी पक्षाच्या हॅकर्सकडून हा उद्योग सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चीनने हे उद्योग बंद करावेत अशी तंबीही अमेरिकेने जाहीरपणे दिली आहे. त्यांच्या या प्रकारामुळे करोनावर प्रभावी औषध शोधण्याच्या प्रकियेत खंड येत आहे, असेही पॉम्पेओ यांनी म्हटले आहे. दरम्यान चीनने अमेरिकेचा हा आरोप फेटाळून लावला आहे. हा खोडसाळपणाचा आरोप असून कोणाला तरी बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सतत सुरू असतो त्याचा हा एक भाग आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
चीनच्या विदेश व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजीयान यांनी म्हटले आहे की अमेरिकेला त्यांच्या देशातील करोनाची समस्या अजून नीट हाताळता आलेली नाहीं म्हणूनच त्यांनी लोकांचे लक्ष अन्यत्र विचलीत करण्यासाठी हा उद्योग चालवला आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या करोना प्रादुर्भावावरून जोरदार आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. त्यात अमेरिकेने चीनवर थेट माहिती चोरीचा आरोप केल्याने या आगीत इंधनच टाकले गेले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पॉम्पेओ यांनी चीनवर कठोरपणे टीका करणारे एक नवे निवेदन प्रसिद्धीला दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की अमेरिका आणि आमचे मित्र देश सामुहिक जबाबदारीने,आणि पारदर्शकपणे प्रयत्न करून लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्याचवेळी चीन मात्र तिकडे त्यांच्या देशातील वैज्ञानिक, पत्रकार, आणि नागरीकांची मुस्काटदाबी करून त्यांना गप्प करीत आहेत आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करीत आहेत.