माजी नगरसेविकेचा पतीसह जाहीर प्रवेश
पिंपरी – राज्यातील सत्ता गेल्यानंतर भारतीय जनता पक्षातील इनकमिंग थांबले होते. मात्र आज भोसरीत माजी मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेसह त्यांच्या पतीने भाजपात प्रवेश केल्याने या पक्षातील इनकमिंग अद्यापही सुरूच असल्याचे दिसून आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका मंदाकिनी ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये गुरुवारी जाहीर प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भोसरी येथील इंद्रायणी थडी जत्रेच्या उद्घाटन कार्यक्रमात हा प्रवेश झाला.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, राहुल कूल, महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक दोन वर्षांवर आली आहे. महापालिकेत सध्या भाजपाची सत्ता आहे. भाजपाचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्यापुढे महापालिकेत सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. यासोबतच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महाविकास आघाडीची ताकद वाढत आहे. महेश लांडगे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे अर्जुन ठाकरे आणि मंदाकिनी ठाकरे यांनी भाजपात प्रवेश केल्याने किमान पिंपरी-चिंचवड शहरात तरी भाजपातील इनकमिंग कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.