पुणे – आंबेगाव (खुर्द आणि बुद्रूक), धायरी, वडगाव बुद्रूक, वडगाव खुर्द या परिसरात प्रत्यक्ष जागेवर जाऊन व्यावसायिक मिळकतींची तपासणी मोहिमेची सुरूवात महापालिकेने सुरू केली आहे. पुढील चार महिने ही मोहीम राबविण्यात येणार असून पहिल्याच दिवशी अनधिकृत जागेचा वापर तसेच कर थकविलेल्या आणि कर आकारणी झालीच नसलेल्या सहा मिळकती महापालिकेने शोधल्या आहेत त्यांचा कर एक कोटींपेक्षा अधिक आहे.
महापालिकेच्या पथकाने सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत तब्बल 25 मिळकतींची तपासणी केली. त्यात, सहा मिळकतींवर कारवाई करण्यात आल्याचे कर संकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी सांगितले. यामध्ये इमारतीच्या टेरेसवर हॉटेल व्यावसाय, साईड व फ्रंट मार्जिंनचा व्यावसायिक वापर तसेच कर आकारणी न करताच रिकाम्या जागांमध्ये गोडावून उभारण्यात आल्याचे समोर आले आहे. यातील काही मिळकतींना तीन पट कर आकारणी करण्यात आली तर काही मिळकती सील करण्यात आल्याचे कर संलकन उपायुक्त देशमुख यांनी सांगितले.
थकबाकी असलेल्या, कर आकारणी न झालेल्या तसेच वापरात बदल करण्यात आलेल्या मिळकतींची तपासणी महापालिकेने सुरू केली आहे. पुढील चार महिने ही तपासणी केली जाणार आहे. यासाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली असून प्रत्यक्ष जागेवर जाऊन ही तपासणी केली जाणार आहे, असे कर संकलन विभागाचे उपायुक्त अजित देशमुख म्हणाले.
गोडाऊन आणि हॉटेलवर कारवाई…
महापालिकेच्या पथकाने मंगळवारी आंबेगाव (खुर्द आणि बुद्रूक), धायरी, वडगाव बुद्रूक, वडगाव खुर्द या भागात केलेल्या कारवाईत प्रामुख्याने हॉटेल तसेच गोडावूनची तपासणी केली. यामध्ये एका हॉटेलने साइड व फ्रंट मार्जिनसह रूफटॉपवर व्यवसाय केल्याने तीनपट कर आकारणी करण्यात आली, तर दोन हॉटेलची 40 लाख रुपयांची थकबाकी असल्याने ती सील करण्यात आली. तर, एका हॉटेल चालकाने सील करताना तब्बल 30 लाखांच्या थकबाकीचा धनादेश महापालिकेस लगेच दिला. या शिवाय, एक 20 हजार चौरसफूटाचे तर दुसरे 14 हजार चौरसफूटाच्या गोडाऊनची कर आकरणीच झालेली नव्हती, त्यांच्याकडून 2019 पासून तीन पट कर आकारणी करण्यात आली.