नवी दिल्ली – हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल यांच्या घरावर आयकर विभागाने आज छापे टाकले आहेत. मुंजाल यांच्याशिवाय त्यांच्या कंपनीच्या इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जागेवर छापे टाकण्यात आले आहे. हे छापे करचुकवेगिरीच्या प्रकरणांशी संबंधित आहेत. देशातील सुमारे तीन डझन ठिकाणी आयकर विभागाकडून छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार त्यांच्या निवासस्थानांवर आणि गुडगांवमधील ऑफिसमध्ये सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे.
आयकर विभागाने एअर चार्टर एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि हिरो मोटोकॉर्प ग्रुपवर छापे टाकले असून सुमारे 24 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. दिल्ली, नोएडा, गुडगाव, गाझियाबाद पंजाबमध्ये ही छापेमारी सुरू आहे. मात्र या छापेमारीबाबत हीरो मोटोकॉर्प आणि प्राप्तिकर विभागाने अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.
मुंजाल यांनी त्यांच्या खात्यांमध्ये खोटे खर्च दाखवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. प्राप्तिकर विभागाने त्याबाबतच सकाळपासून छापेमारी सुरू केली आहे. प्राप्तिकर विभागाच्या पथकाला जे संशयास्पद खर्च सापडले आहेत, त्यामधील काही खर्च इनहाऊस कंपन्यांचेही आहेत.