नवी दिल्ली – खाणउद्योग आणि हॉटेल व्यवसायाशी संबंधित उद्योजक आणि मोठ्या सहकारी बॅंकेच्या अध्यक्षाच्या विरोधात प्राप्तीकर विभागाने बिहार आणि उत्तर प्रदेशात काही ठिकाणी छापे घातले. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आज ही माहिती दिली.
पाटणा, ससाराम आणि वाराणसी येथे हे छापे घालण्यात आले. या छाप्यांच्यावेळी तब्बल 1.25 कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली. तर 6 कोटी रुपयांच्या मुदत ठेवीच्या पावत्या प्रतिबंधात्मक आदेशांखाली ठेवण्यात आल्या आहेत.
खाण उद्योग आणि हॉटेल व्यवसायाशी संबंधित एका उद्योगपतीच्या कारमधून 75 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही रोख रक्कम बेनामी असल्याचे आणि त्याचा संबंध एका मोठ्या सहकारी बॅंकेच्या अध्यक्षांशी असल्याचेही आढळून आले आहे, असे सीबीडीटीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बेहिशेबी रोख रक्कम आणि या रोख रकमेच्या व्यवहारांशी संबंधित कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. हा व्यवहार संबंधित उद्योजकाच्या प्राप्तीकर विवरणामध्ये दर्शवत नसल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. मात्र, हे छापे कोणावर घातले गेले, याचा उल्लेख “सीबीडीटी’ने केलेला नाही.