सातारा -जागतिक वारसा स्थळ दर्जा लाभलेल्या कास पठारावरील संवेदनशील क्षेत्रात बेकायदेशीर फार्म हाऊस उभारणाऱ्या धनदांडग्या मिळकतधारकांची आयकर विभाग आणि प्रवर्तन संचालनालय विभागामार्फत चौकशी व्हावी अशी तक्रार दिशा विकास मंच अध्यक्ष सुशांत मोरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. ही चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
यासंदर्भात प्रवर्तन संचालनालयाकडे पाठवलेल्या निवेदनात नमूद आहे की, मालमत्ताधारकांनी कोट्यवधी रुपये कोणत्या माध्यमातून खर्च केले याची चौकशी व्हावी.
कारण सर्वसामान्य माणसांना घर बांधणीसाठी बऱ्याच तांत्रिक परवानग्यांमधून जावे लागते. कास सारख्या जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या पर्यटन स्थळावर बांधकाम परवानगी मिळू शकत नाही, असे असताना 124 मालमत्ता धारकांनी जे हॉटेल आणि रिसॉर्ट उभे केले ते कर बुडवून दोन नंबरच्या पैशातून उभारण्याची शंका निवेदनात मोरे यांनी उपस्थित केली आहे. महसूल विभागाचे अधिकारी, तहसीलदार, कर्मचारी यांनी या प्रकरणांना पाठीशी घातल्याशिवाय ही कामे होऊच शकत नाही. यामागे महसूल विभाग अनेक वर्ष पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या मागणीला कचऱ्याची टोपली दाखवत आहे.
त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचा गंभीर आरोप मोरे यांनी केला आहे. बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात कर चुकवला गेला असावा अशी शंका असल्याने या प्रकरणांची इन्कम टॅक्स विभागाने सुद्धा चौकशी करावी. या प्रकरणात दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेच पाहिजे, या प्रकरणात राजकीय दबाव येण्याची शक्यता असल्याने या गंभीर प्रकरणाची चौकशी प्रवर्तन संचालनालयाने करावी अन्यथा तीव्र आंदोलन करून या प्रकरणाकडे लक्ष वेधण्याचा इशारा सुशांत मोरे यांनी दिला आहे.