सातारा -दोन दुचाकी व एक अल्टो कारच्या तिहेरी अपघातात युवकाचा मृत्यू झाला. केतन यशवंत लेंभे (रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव) अपघातातील मृत युवकाचे नाव आहे. ही घटना शनिवार, दि. 20 रोजी सायंकाळी 6 वा. आरळे, ता. सातारा गावच्या हद्दीत घडली.अधिक माहिती अशी, केतन लेंभे (वय 25) आणि जय उत्तम भोईटे (वय 22, आदर्की बुद्रुक, ता. फलटण) हे दोघेही शनिवारी सकाळी कामानिमित्त सातारा येथे आले होते.
काम आटोपून माघारी जाताना आरळे येथे अल्टो कारने केतनच्या दुचाकीला कट मारला. यावेळी दुचाकीवरील वेग नियंत्रण करताना रस्त्यावरील खड्डे चुकवताना समोर जाणाऱ्या दुचाकीवर केतन व जयची गाडी धडकली. यामध्ये दोघेही जण गंभीर जखमी झाल्याने दोघाना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, रविवारी उपचारादरम्यान केतन लेंभे याचा मृत्यू झाला.