नाशिक – नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या पथकाने गेले सहा दिवस छापे टाकले. या कारवाईत सुमारे 3 हजार 333 कोटींचे बेहिशेबी मालमत्तेचे व्यवहार उघडकीस आले आहेत. तर साडेपाच कोटींची रोकड आणि दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. आयकर विभागाची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या आयकर अन्वेषण विभागासह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे व मुंबई, नागपूर कार्यालयातील 225 अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक दिवस-रात्र ही कारवाई करत होते. 90 हून अधिक वाहनांच्या ताफ्यातून आलेल्या या पथकांनी बांधकाम व्यावसायिकांची 40 ते 45 कार्यालये, बंगले, फार्म हाऊस याठिकाणी छापे टाकले.
20 एप्रिलला पहाटे सहा वाजेच्या सुमारास सुरु झालेली कारवाई 25 एप्रिलपर्यत चालली. या छाप्यामध्ये आयकर विभागाच्या हाती मोठी मालमत्ता लागण्याची शक्यताही वर्तवली जात होती. शहरात अनेक व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरु आहेत. त्यात कागदावर अतिशय कमी उलाढाल दाखवून करचुकवेगिरी केल्याचा संशय आयकर विभागाकडून व्यक्त केली जात आहे.