यंदा रग्गड आयकर संकलन

2018-19 मध्ये 57,500 कोटी रुपयांची प्रत्यक्ष करवसुली

पुणे – आयकर विभागातर्फे 2018-19 या आर्थिक वर्षात पुणे विभागात 57,500 कोटी रुपयांची प्रत्यक्ष करवसुली केली आहे. करसंकलनामध्ये 14 टक्‍क्‍यांनी वाढ करत, देशात पुणे विभागाने सहावा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे कामगिरी निश्‍चितच चांगली असल्याचा विश्‍वास आयकर विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.

विदर्भातील अकरा जिल्हे आणि मुंबई वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्र हा पुणे आयकर विभागात सामाविष्ट आहे. राज्यातील एक मोठा भूभाग या विभागांतर्गत सामाविष्ट असल्याने साहजिकच या अंतर्गत करवसुलीचे अधिक उद्दिष्ट आहे. त्यानुसार करसंकलनात अपेक्षित प्रगती करत विभागाने यंदा 57,500 कोटी रुपयांची प्रत्यक्ष वसुली केली आहे. गेल्या वर्षी ही रक्‍कम 51,500 कोटी होती, तर 2019-20 या आर्थिक वर्षासाठी विभागाला 72,763 कोटी रुपयांची करवसुली करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पुणे विभागात कर भरणाऱ्या नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. गेल्या 5 वर्षांत करदाते आणि कर दोन्हींमध्ये चांगलीच वाढ झाली असून त्यामुळेच करवसुलीमध्ये विभागाने देशात सहावा क्रमांक मिळविला आहे. 5 वर्षांपूर्वी विभागातील करदात्यांची संख्या 31 लाख होती, ती आता वाढून 76 लाखांवर पोहोचली आहे. यामध्ये प्रामुख्याने अन्नप्रक्रिया, माहिती व तंत्रज्ञान, वाहननिर्मिती आणि बांधकाम व्यवसाय या क्षेत्रातील नागरिक आणि उद्योजकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.’

करदात्यांसाठी “करदाता सहयोग अभियान’
देशभारातून इंटरनेटद्वारे कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ई-फायलिंगबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आयकर विभागातर्फे देशपातळीवर करदाता सहयोग अभियान राबविण्यात येणार आहे. 24 जुलै रोजी दिल्ली येथे या अभियानाचा प्रारंभ होणार असून, प्रत्येक विभागीय कार्यालयांतर्गत करदात्यांना इ-फायलिंगबाबत माहिती उपलब्ध करून देणार आहेत. यामध्ये विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असेल, अशी माहिती आयकर विभागातर्फे देण्यात आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)