सातारा परिसर बहरला…

महादरे तलाव भरला, घाटात धबधबे कोसळू लागले

सातारा – दीर्घ काळ उसंत दिलेल्या पावसाने आता जोर धरला असून गेल्या काही दिवसांतील पावसामुळे सातारा शहराचा परिसर बहरून गेला आहे. शहराच्या बाजूच्या सर्व डोंगरांनी हिरवाईची शाल पांघरली आहे. परिसरातील तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. ओढेनाले खळाळून वाहत आहेत. पावसात चिंब भिजण्याचा आनंदही काही जण घेताना दिसत आहेत.

सातारा शहरात जून महिनाअखेरपर्यंत पावसाने दडी मारली होती. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत काही प्रमाणात पाऊस झाल्याने पेरणीसाठी पाऊस उपयुक्त ठरला होता. त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली होती. गेल्या दोन दिवसांत पुन्हा एकदा पावसाने बरसण्यास सुरुवात केली आहे. रविवारी अगदी हजेरी लावून गेलेला पाऊस सोमवारी कोसळू लागला. मुसळधार सरींनी परिसर न्हाऊन निघाला. ओढे नाले खळाळून वाहताच होते, पण रस्त्यांवरूनही पाणी वाहू लागले. शहरात काही ठिकाणी पाणी साचले होते. सोमवारी सकाळी धुक्‍याने लपटलेले शहर दुपारनंतर पावसांच्या सरींनी गजबजून गेले. त्यामुळे निसर्गाचे रंगही बदलत राहिले.

यवतेश्‍वरच्या घाटातील छोट्या छोट्या धबधब्यांचे तुषार गतीने ओसंडू लागले. शहराच्या पश्‍चिमेस असलेले महादरे तसेच हत्ती तळेही भरून वाहू लागले. निसर्गरम्य अजिंक्‍यतारा किल्ला, पेढ्याचा भैरोबाचा डोंगर, यवतेश्‍वरचा डोंगर हिरवेगार दिसू लागल्याने शहराभोवती विलोभनीय दृश्‍यांची पर्वणी सुरू झाली आहे. शहर व परिसराप्रमाणेच पश्‍चिमेकडे कास परिसर तसेच ठोसेघर परिसरातही पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे निसर्ग आणखी बहरणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)