देहूगाव, (वार्ताहर) – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने मुंबई येथील चित्रकार प्रकाश पाटील यांनी तयार केलेले बोधचिन्हाचे अनावरण व लोकार्पण मुख्य मंदिरातील भजनी मंडपामध्ये करण्यात आले.
देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, नगराध्यक्षा पूजा दिवटे, संस्थानचे अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज मोरे, चित्रकार प्रकाश पाटील यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, नगरसेवक योगेश काळोखे, प्रवीण काळोखे, योगेश परंडवाल, सचिन कुंभार, डॉ. सदानंद मोरे, अभंग प्रतिष्ठानचे विकास कंद, दिलीप गोडसे, मुकेश मोरे आदी उपस्थित होते.
जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा ३७५ वा वैकुंठगमन अमृत महोत्सव सोहळा श्री क्षेत्र देहूगावातच नव्हे तर महाराष्ट्रासह इतर राज्यात अनेक तिर्थक्षेत्र व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी संपन्न होणार आहे. या निमित्त ३ एप्रिल २०२४ ते १४ एप्रिल २०२५ या वर्षभराच्या कालावधित धार्मिक कार्यक्रम होणार आहे. त्या निमित्त प्रसिद्ध करण्यात येणारे पत्रक, निवेदने, जाहिरात फलकांवर संत तुकोबारायांच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त बनविण्यात आलेले बोधचिन्ह असणार आहे, अशी माहिती संस्थांचे विश्वस्त हभप माणिक महाराज मोरे यांनी दिली.