महापालिकेच्या 287 शाळांमध्ये प्रकल्प
पुणे – पालिका शाळांमध्ये एकत्रित इंटरनेटशी जोडून एकाचवेळी संवाद साधणाऱ्या यंत्रणेसह ई-लर्निंगद्वारे अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. त्यासाठीचा प्रकल्प अखेर 2 वर्षांनंतर पूर्ण झाला असून त्याचे उद्घाटन बुधवारी खासदार गिरीश बापट यांच्याहस्ते केले जाणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली. माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला होता. सायंकाळी 4 वाजता शिक्षण विभागाच्या मुख्य कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
शिक्षण विभागाच्या शहरात 287 शाळा असून त्यात 1 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळांमध्ये ई-लर्निंग प्रकल्प राबविण्यासाठी माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेतला होता. सुरुवातीला हा प्रकल्प खर्चावरून वादग्रस्त ठरला असला तरी, 23 कोटींच्या खर्चास मान्यता देत हा प्रकल्प सुरू केला होता.
सुमारे वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित होणे अपेक्षित असताना, वर्गखोल्यांची उपलब्धता, तांत्रिक अडचणी तसेच अभ्यासक्रम निश्चित करण्यासह त्याची तपासणी आणि त्याची मान्यता अशा घटकांसाठी या प्रकल्पास सुमारे 2 वर्षांचा कालावधी लागला आहे. त्यानंतर अखेर हा प्रकल्प सुरू होणार आहे. या प्रकल्पांतर्गत शिक्षण विभागाच्या मुख्य कार्यालयात अत्याधुनिका स्टुडीओ उभारण्यात आला असून त्या माध्यमातून सर्व शाळांमध्ये एकाचवेळी संवाद साधणे तसेच व्याख्यानांचे कार्यक्रम घेणे शक्य होणार आहे.