मुंबई – ममता बॅनर्जी एकहाती एका पायावर लढल्या. त्यांचे अभिनंदन करणाऱ्या भुजबळ यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धमकीवजा इशारा दिला. अशा पद्धतीने धमक्या देऊन भाजप आपली उरलीसुरली पत का घालवीत आहे? विजयाबद्दल अभिनंदन करणाऱ्यांना धमकावणे,तुरुंगात टाकणे या असहिष्णुतेस महाराष्ट्र धर्मात तरी स्थान नाही. भाजप महाराष्ट्रातून सत्तेबाहेर जाण्यास त्यांची ही असहिष्णुताच जबाबदार आहे!भाजप नेत्यांचा’अॅरोगन्स’ म्हणजे मस्तवाल भाषा हे त्यांच्या बंगालमधील दारुण पराभवाचे एक कारण आहे. महाराष्ट्रातील सदैव गुरगुरणाऱ्या लोकांनी याचे भान ठेवले तर बरे होईल.
छगन भुजबळ यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले. त्यात काय चुकलं? पाकिस्तानात सत्तांतर होते तेव्हा पंतप्रधान मोदीही पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचे अभिनंदन करतात. हा एक राजशिष्टाचार आहे, पण भुजबळांनी ममतांचे अभिनंदन केल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना इतका राग आला की, त्यांनी भुजबळांना ते जामिनावर सुटले असल्याची आठवण करून दिली. पाटलांनी भुजबळांना इतर बऱ्याच धमक्या आणि इशारे दिले. थोडक्यात काय, तर भुजबळांनी गप्प बसावे. नाहीतर त्यांना पुन्हा तुरुंगात टाकण्याची क्षमता आपल्यात आहे, असे पाटील यांना सुचवायचे आहे का? हा एकप्रकारे न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रकार आहे. श्री. भुजबळ हे पाटलांना उत्तर देण्यास समर्थ आहेत, पण याचा एकच अर्थ घ्यायला हवा तो म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील संयम-संस्कार व संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरेस हे शोभणारे तसेच परवडणारे नाही. प. बंगालात ममता बॅनर्जी यांनी दिग्विजय मिळवलाच आहे व बंगाल काबीज करण्यासाठी जे गेले ते बंगालच्या खाडीत गटांगळय़ा खात आहेत. हे चित्र तुम्ही कसे बदलणार? ममता बॅनर्जी यांनी 216 जागा जिंकण्याचा चमत्कार केला याबद्दल त्यांचे अभिनंदन सगळेच करीत आहेत. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही ममतांचे जाहीर अभिनंदन केले. आता मोदी, शहा, राजनाथ सिंहांवरही चंद्रकांतदादा राग राग करणार की ममतांचे अभिनंदन केले म्हणून गुजरातमधल्या जुन्या प्रकरणांची थडगी उकरून काढण्याच्या धमक्या देणार? तिकडे भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनीही ममता यांना शुभेच्छा देण्यास तर नकार दिलाच, पण प. बंगालच्या जनतेने भ्रष्ट आणि क्रूर महिलेला पुन्हा सत्तेत आणून ऐतिहासिक चूक केली, असे तारेदेखील आपल्या फेसबुक पोस्टमध्ये तोडले. त्यावर चौफेर टीका होऊ लागताच त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. मात्र भाजपवाल्यांची डोकी
ममतांच्या विजयामुळे कशी कामातून गेली आहेत याचाच हा पुरावा आहे. असा टोला शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपला लगावला. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पश्चिम बंगालच्या निवडणुकीबाबत वक्तव्य करण्यात आले आहे.
संपूर्ण बंगाल दोनेक महिने ‘जय श्रीराम’च्या गर्जनांनी घुमत होता, पण ‘जय श्रीराम’नेही भाजपच्या विजयासाठी त्यांचे कोदंड धनुष्य उचलले नाही. आता ममतांचा विजय झाला म्हणून महाराष्ट्रातील भाजपवाले श्रीरामास पुन्हा वनवासात पाठवण्याची धमकी देणार का? लोकशाहीत हार-जीत व्हायचीच. पाच राज्यांतील निवडणुकांत काँग्रेसचा मोठा पराभव झाला, पण आसामात भाजपचे व बंगालात ममतांचे अभिनंदन राहुल व सोनिया गांधी यांनी केलेच आहे. विजयाबद्दल अभिनंदन करणाऱ्यांना धमकावणे, तुरुंगात टाकणे या असहिष्णुतेस महाराष्ट्र धर्मात तरी स्थान नाही. भाजप महाराष्ट्रातून सत्तेबाहेर जाण्यास त्यांची ही असहिष्णुताच जबाबदार आहे! भाजप नेत्यांचा ‘अॅरोगन्स’ म्हणजे मस्तवाल भाषा हे त्यांच्या बंगालमधील दारुण पराभवाचे एक कारण आहे. महाराष्ट्रातील सदैव गुरगुरणाऱ्या लोकांनी याचे भान ठेवले तर बरे होईल. असे शिवसेनेनं यात म्हटले आहे.