संगमनेर – कुत्रा आणि बिबट्या यांच्या झुंजीचा थरार म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखा प्रसंग आहे. बिबट्यानं कुत्र्यावर झडप घालून कुत्र्याची शिकार केल्याचे अनेक वेळा ऐकले असेल. परंतु कुत्राने बिबट्यावर हल्ला करून त्याला चक्क पळून लावल्याची घटना संगमनेर तालुक्यातील वाघापूर गावात घडली. त्यामुळे गलीमेतो कुत्ता भी शेर होता है, ही म्हण प्रत्यक्षात उतरली.
बिबट्यांचे मानवी वस्तीत शिरणे हे काही नवीन राहीलेलं नाही. मानवीवस्तीत येऊन मांजरे, कोंबड्या आणि पाळीवसह भटक्या कुत्र्यांवर ताव मारणे हे बिबट्यांसाठी नित्याचेच झाले आहे. पाळीव अथवा भटकी कुत्री बिबट्याच्या भक्षस्थानी पडण्यास फारसा वेळ लागत नाही. मात्र बिबट्याचे सहज शिकारीचे हे डावपेच प्रत्येक वेळी साध्य होतातच, असे नाही. संगमनेर तालुक्यातील वाघापूर गावामध्ये आज सकाळी साडेसात वाजता गव्हाळीवस्ती येथे अण्णासाहेब लहानू शिंदे यांच्या घराजवळ सकाळी बिबट्याचा एक बछडा कुत्र्याला दिसला.
या कुत्र्याने त्या बछड्याचा पाठलाग केला. त्यानंतर जीव वाचविण्यासाठी हा बछडा धावू लागला. त्यानंतर तो एका झाडावर चढला. परंतु कुत्रा त्याला खाली उतरु देत नव्हता. हा खेळ तब्बल अर्धा तास सुरु होता. दरम्यान आजूबाजूला असणाऱ्यांनी कुत्रा आणि बिबट्याचा खेळ आपापल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपून घेतला. अर्ध्या तासानंतर बिबट्या झाडावरून खाली पडला असता कुत्र्याने पुन्हा त्याचा पाठलाग केला.
कुत्रा आणि बिबट्यामध्ये पुन्हा चांगलीच झुंज झाली. बलाढ्य बिबट्याला हा कुत्रा नडला आणि त्यानं चक्क बिबट्याला पळवून लावलं..याअगोदरही या परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार पाहण्यास मिळालाय. त्यामुळे या ठिकाणी पिंजरे लावण्याची मागणी सुनील संपत शिंदे, शरद शिंदे, अण्णासाहेब शिंदे, भाऊसाहेब शिंदे, बबन शिंदे, सुरेश शिंदे आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.