डेहराडून – उत्तराखंड मध्ये ज्या आमदारांची भारतीय जनता पक्षाने तिकीटे कापली आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर करण्याची तयारी चालवली असून काहींनी बंड करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याने भाजपपुढे ही बंडाळी रोखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपने 59 उमेदवार जाहीर केल्यानंतर पक्षातील अस्वस्थता जाहीरपणे पुढे आली आहे.
भाजपचे विद्यमान आमदार थरलीमुन्नी देवी आणि महेश नेगरी यांनी पक्षाच्या विरोधात बंड करण्याचे जाहीरपणे नमूद केले आहे. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे योजले आहे. भाजपचे नरेंद्र नगर भागातील शक्तिशाली नेते गोपाल रावत यांच्या ऐवजी भाजपने कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल यांनो तिकीट दिल्याने रावत यांनी कॉंग्रेस मध्ये प्रवेश करण्याचा इरादा घोषित केला आहे.
भारतीय जनता पक्षाला निष्ठावान कार्यकर्त्यांची गरज नाही त्यांना मुल्यांशीही काही देणेघेणे नाही त्यांना फक्त सत्ता हवी आहे असे त्यांनी म्हटले आहे. धनौली मध्ये भाजतपने प्रितमसिंह पवंर यांना उमेदवारी दिल्याने माजी आमदार महाविर रंगड हे नाराज झाले असून त्यांनीही अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. भीमताल, नौतियाल अशा मतदार संघांमध्येही भाजपपुढे बंडखोरीचे आव्हान निर्माण झाले आहे.