लंडन -ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताची ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू पी. व्ही. सिंधूने विजयी सलामी दिली. महिला आणि पुरुष दुहेरीत भारतीय जोड्यांनी मोहिमेस यशस्वी सुरवात केली. मात्र, पुरुष एकेरीत भारताच्या किदाम्बी श्रीकांत व पी. कश्यपला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
महिला एकेरीत सिंधूने मलेशियाच्या सोनिया शेह हिचा 21-11, 21-17 असा पराभव करून आपल्या मोहिमेस यशस्वी सुरवात केली. दुसरी गेम जिंकण्यास तिला झगडावे लागले. आता दुसऱ्या फेरीत सिंधूची गाठ डेन्मार्कच्या लिने ख्रिस्तोफर्सन हिच्याशी पडणार आहे. तिने स्लोवाकियाच्या मार्टिना रेपिस्का हिचा पराभव केला.
महिला आणि पुरुष दुहेरीत भारतीय जोड्यांनी आश्चर्यजनक कामगिरी केली. अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी जोडीने बेनयापा एमसार्ड-नुन्ताकर्न एमसार्ड जोडीचे आव्हान अवघ्या 30 मिनिटांत 21-14, 21-12 असे मोडून काढले. सत्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टीने पहिल्या फेरीचा अडथळा पार करताना अनिरुद्ध मयेकर आणि निखर गर्ग या जोडीचा 21-7, 21-10 असा पराभव केला.
पुरुष एकेरीत आठव्या मानांकित श्रीकांतला जागितक क्रमवारीत 57 व्या स्थानावर असलेल्या आयर्लंडच्या नहात न्गुयेन याच्याकडून 11-21, 21-15, 12-21 अशी हार पत्करावी लागली. पी. कश्यपला केंटो मोमोटाकडून पराभव सहन करावा लागला. मोमोटाने लढत 21-13, 22-20 अशी जिंकली. पुरुषांच्या दुहेरीतील आणखी एक जोडी एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला यांचेही आव्हान संपुष्टात आले. त्यांना ओंग यू सिन-तेओ ए यी जोडीकडून 21-13, 21-12 अशी हार मानावी लागली.
सायनाची माघार
भारताची फुलराणी सायना नेहवाल पहिल्याच फेरीत पराभूत झाली. तीला त्रास जाणवू लागल्यामुळे तीने माघार घेतली. स्वित्झर्लंडच्या सातव्या मानांकित मिया ब्लिडफेल्टविरुद्धच्या सामन्यात 8-21 अशी पहिली गेम सायनाने गमावली. व दुसऱ्या गेममध्ये 4-10 अशी पिछाडीवर असताना तीने दुखापतीमुळे सामना सोडला. यामुळे यंदाच्याही स्पर्धेतील तीचे आव्हान संपूष्टात आले आहे.