Entertainment: ‘हनुमान’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या यशानंतर आता प्रेक्षकांना याच्या सीक्वेलची उत्सुकता लागली आहे. यातच आता या सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ‘हनुमान 2’मध्ये दाक्षिणात्य अभिनेता राम चरण श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.
प्रशांत वर्मा दिग्दर्शित या सिनेमात राम चरण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘हनुमान 2’ या सिनेमाचं नाव ‘जय हनुमान’ असे असणार आहे. या सिनेमाच्या कास्टिंगला आता सुरुवात झाली आहे. ‘हनुमान’च्या ‘जय हनुमान’ या दुसऱ्या भागासाठी निर्मात्यांनी साऊथचा सुपरस्टार राम चरणशी संपर्क साधल्याचे म्हंटले जात आहे. त्याने या चित्रपटात श्रीरामाची भूमिका करावी अशी निर्मात्यांची इच्छा आहे. अद्याप या प्रकरणी निर्मात्यांनी किंवा राम चरणच्या टीमकडून कोणतीही पुष्टी झालेली नाही. राम चरणने याआधी ‘RRR’ या सुपरहिट चित्रपटात राम नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
‘अधीरा’ या सिनेमानंतर प्रशांत वर्मा ‘जय हनुमान’ या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करू शकतात. राम चरणच्या आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे. त्याचा ‘गेम चेंजर’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 34 वर्षांचा प्रशांत टॉलिवूडच्या तरुण आणि महत्त्वाकांक्षी दिग्दर्शकांमध्ये गणला जातो. 2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘Awe’ चित्रपटातून त्याने पदार्पण केले होते.
दरम्यान, ‘हनुमान’ हा सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी हनुमानने 8.5 कोटींची कमाई केली होती. सहा दिवसांत बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 70 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हा सिनेमा आणखी कमाई करण्याची शक्यता आहे.