पावसाळ्यात आंबेगावात वीजपुरवठ्यात व्यत्यय नको

मंचर – महावितरण कंपनीने पावसाळ्यात वीज पुरवठ्यात व्यत्यय येऊ नये म्हणून आवश्‍यक ती कार्यवाही करून वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आंबेगाव तालुक्‍यातील ग्राहकांनी केली आहे.

पावसाळा सुरू होण्याअगोदरच विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून दिवसभरात तासनतास रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरगुती वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. तरी पावसाळा सुरू होण्याआधी महावितरणने नादुरुस्त फ्युज, गंजलेल्या विद्युत तारा, वाकलेले खांब सरळ करणे आदी कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. काठापूर सबस्टेशन येथून तालुक्‍याच्या 70 टक्‍के भागाला वीजपुरवठा केला जातो. मंचर परिसरात विजेचे सबस्टेशन शेवाळवाडी खानवस्तीवर आहे. तिथून मंचर आणि परिसरातील सहा ते सात गावांना वीजपुरवठा केला जातो; परंतु अनेकवेळा तांत्रिक कारणाने वीजपुरवठा खंडीत होतो. अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, गावडेवाडी या गावांसाठी अवसरी खुर्द येथे विद्युत वितरण कंपनीचे वीज उपकेंद्र आहे. या उपकेंद्रांतर्गत 4500 ते 5000 घरगुती कृषी पंपधारक ग्राहक आहेत. सध्या विजेचा दाब कमी-अधिक होत असल्याने घरातील फ्रीज, टीव्ही, पंखे यांचे वायरिंग जळणे, घरातील बल्ब उडणे हे प्रकार होऊन घरगुती ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.