कर्जत, (वार्ताहर) – कर्जत तालुक्यामधील ग्रामपंचायत हद्दीतील तसेच खालापूर तालुक्यातील छत्तीस विभागातून विविध पक्षातील असंख्य महिला व तरुणांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. त्यांचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी स्वागत केले.
राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. त्या वेळी घारे म्हणाले की, आपल्या पक्षात सर्वांचाच मानसन्मान होणार, उंची वाढेल, लवकरच गावभेटींना सुरुवात करून आपले विचार सांगू. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत, खालापूरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन बळकटीवर भर दिला आहे. दर रविवारी तालुकास्तरावर नियुक्ती पत्रक देऊन नियुक्ती करण्यात येत आहे.
या वेळी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अंकित साखरे, राष्ट्रवादी कर्जत महिला अध्यक्षा रंजना धुळे, पूजा सुर्वे, जिल्हा सरचिटणीस अशोक भोपतरव, एकनाथ धुळे, राष्ट्रवादी कर्जत तालुका अध्यक्ष भगवान चंचे, ज्येष्ठ नेते भगवान भोईर, प्रसाद पाटील, दीपक श्रीखंडे, शिवाजी खारीक, प्रकाश पालकर आदी उपस्थित होते.