पिंपरी, (प्रतिनिधी) – गेल्या काही वर्षांमध्ये पशूपालक पशूखाद्यांच्या वाढत्या दराने त्रस्त झाले होते. परंतु यंदा काहीशी दिलासादायक स्थिती असल्याचे दिसून येत आहे. पशूखाद्य विके्रत्यांनुसार यंदा कडबा कुट्टीचा दर कमी होण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात तसेच मावळ परिसरात शेतकरी आणि गौपालकांची संख्या अधिक आहे. देशी गायीचे दूध आरोग्यासाठी अधिक चांगले असल्याने गेल्या काही दिवसांमध्ये देशी गोवंश पाळण्यावर शेतकर्यांनी आणि पशूपालकांनी भर दिला आहे. परंतु जर्सी किंवा विदेशी गायींच्या तलुनेत देशी गायी दूध खूप कमी देतात. तसेच सर्वकाळ दूध देत नसतात.
शेतकर्यांकडे साधारणतः दोन ते तीन गायी आणि वासरे असतात. तर गौपालकांकडे यांची संख्या अधिक असते. एका पूर्ण वाढ झालेल्या गायीला दिवसभरात 20 ते 25 किलो चार्याची गरज असते. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे पशूखाद्य समाविष्ट करुन पोषक आहार बनावावा लागतो.
यात सर्वांत महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे कडबा कुट्टी. पावसाळ्यापासून ते जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत सगळीकडे हिरवे गवत उपलब्ध असल्याने चार्याचा खर्च खूप कमी होतो. परंतु जानेवारी-फेब्रुवारीनंतर हा खर्च वाढतो. जे शेतकरी किंवा पशूपालक यांच्याकडे चार्याचे गवत किंवा इतर खाद्य लावण्यासाठी पुरेशी जमीन नसते त्यांच्यासाठी गोपालन खूपच खर्चिक होते. बहुतेक खाद्य विकत आणावे लागते.
उतरणार दर
काही दिवसांपूर्वी कडबा कुट्टीचे दर १८ रुपये प्रति किलोपर्यंत पोहचले होते. एका पूर्ण वाढ झालेल्या गायीसाठी रोजची किमान सात ते दहा किलो कुट्टी लागत असल्याने हे खूपच खर्चिक होते. परंतु आता हा दर १५ रुपये प्रतिकिलोपर्यंत आला आहे आणि दोन महिन्यांनी १० ते ११ रुपयांपर्यंत खाली उतरण्याची शक्यता वाघजाई पशू खाद्य केंद्राचे संचालक दत्ता येवले यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले. तसेच गोळी पेंड वगळता इतर पशूखाद्यांचेही दर कमी झाले असून अजून कमी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शेवटचा पाऊस ठरला पोषक
मावळ परिसरात झालेले शेवटचे दोन पाऊस ज्वारीसाठी खूपच पोषक ठरल्याने यंदा भरपूर कडबा मिळण्याची शक्यता आहे. तसेच शहरात ज्या कर्जत जामखेडहून कडबा येतो तिथे देखील चांगला पाऊस झाल्याने तिथे देखील ज्वारीचे पीक जोमात आहे. जो कडब्याचा ट्रक काही दिवसांपूर्वीपर्यंत एक लाख रुपयांना येत होता तो आता 70 हजार रुपयांपर्यंत येत आहे.
सध्या असलेला कुट्टीचा दर अजून कमी होणार आहे. यंदा ज्वारीचे पीक जोमात आल्याने कडबा कुट्टीचे दर १२ रुपयांच्या पुढे जाणार नाहीत. दोन महिन्यांनी हे दर १० ते ११ रुपयांपर्यत खाली येण्याची शक्यता आहे. तसेच गोळी पेंड वगळता इतरही पशू खाद्यांचे दर कमी होत आहेत. शेतकरी आणि पशूपालकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. – दत्ता येवले, संचालक, वाघजाई कुट्टी केंद्र, कासारसाई