नवी दिल्ली – महिलांसाठी बचत गटांना प्रोत्साहन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की, गेल्या नऊ वर्षांत भारत महिला विकासाकडून महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाकडे वळला आहे. महिला सक्षमीकरणावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करताना मोदींनी आज देशात अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित या क्षेत्रांमध्ये महिलांची नोंदणी 42 टक्के इतकी असल्याचे अधोरेखित केले.
बचतगटांमध्येही युनिकॉर्न बनवता येतील का, या दृष्टीने आम्ही अर्थसंकल्पात प्रयत्न केले आहेत असे ते म्हणाले. युनिकॉर्न कंपन्या ही एक अशी संकल्पना आहे की, ज्या कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध न होता सुद्धा अब्ज डॉलर्स मूल्यापर्यंत व्यवसाय करू शकतात. पंतप्रधान म्हणाले की, देशातील स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी सरकारने मुद्रा कर्ज योजना सुरू आहे . त्या मुद्रा कर्जाचे सुमारे 70 टक्के लाभार्थी महिला आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले. या महिला केवळ त्यांच्या कुटुंबाची कमाईच वाढवत नाहीत तर देशासाठी नवे आर्थिक मार्गही उघडत आहेत, असे ते म्हणाले.