आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधवप्रकरणी आज निकाल

नवी दिल्ली – भारतीय नौदलाचे अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावर आज दि. 17 जुलै निर्णय देण्यात येणार आहे. जाधव यांच्यावर हेरगिरीचे आरोप असून या प्रकरणी पाकिस्तान न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या शिक्षेच्या विरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) खटला सुरू असून, उद्या त्यावर अंतिम निकाल देण्यात येणार आहे.

उद्याच्या निकालाकडे तमाम भारतीयांचे डोळे लागले आहेत. कुलभूषण जाधव यांना मार्च 2016मध्ये अटक करण्यात आली होती. पाकिस्तानने जाधव यांना बलुचिस्तानमध्ये अटक केल्याचे सांगत त्यांच्यावर हेरगिरीचे आरोप केले होते.

मात्र, भारताने हेरगिरीचा आरोप फेटाळून लावला होता. कुलभूषण यांचे इराणमधून अपहरण करण्यात आल्याचा दावाही भारताने केला आहे. कुलभूषण जाधव यांचा इराणमध्ये व्यापार आहे. भारताने या प्रकरणात व्हिएन्ना करार आणि इतर कायदेशीर बाबींचा आधार घेऊन आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. कुलभूषण यांच्यावर दहशत माजवण्याच्या आणि हेरगिरीच्या आरोपाखाली एप्रिल 2017मध्ये पाकिस्तानने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

कुलभूषण यांच्या पत्नी आणि आईला दिली होती वाईट वागणूक

डिसेंबर 2017मध्ये कुलभूषण यांच्या पत्नी आणि आई यांना पाकिस्तानात जाऊन त्यांची भेट घेण्याची अनुमती देण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानातील अधिकाऱ्यांनी कुलभूषण यांच्या आई आणि पत्नी यांना चांगली वागणूक दिली नव्हती. भेट घेण्यापूर्वी त्यांना बांगड्या आणि दागिने काढून ठेवायला लावले होते. एका काचेच्या खोलीत बसलेल्या कुलभूषण यांना लाऊड स्पिकर असलेल्या फोनवरून संवाद साधण्याची अनुमती दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.