मंगलप्रभात लोढा मुंबईचे अध्यक्ष
नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज चंद्रकांतदादा पाटील यांची महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली असून मंगलप्रभात लोढा यांना मुंबईचे अध्यक्ष बनविण्यात आले आहे. भाजपचे महासचिव आणि कार्यालय प्रभारी अरूण सिंग यांनी प्रसिध्दीपत्रकामार्फत कळविले.
रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात अन्न पुरवठा राज्यमंत्री बनविण्यात आल्यानंतर त्यांनी मंगळवारी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. याशिवाय, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनाही राज्य मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आले आहे. यामुळे त्यांच्या जागी मंगलप्रभात लोढा यांना अध्यक्ष बनविण्यात आले आहे.
दानवे यांनी भाजपाध्यक्षांची भेट घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. यानंतर काही काळातच चंद्रकांतदादा पाटील यांची नियुक्ती झाल्याचे पत्रकारांना सांगण्यात आले. दानवे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यापासूनच नवीन प्रदेशाध्यक्षाबाबत चर्चा सुरू झाली होती.