भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण
मुंबई : विधानसभा निवडणुकांपूर्वी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. नुकतेच सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळाची साथ सोडून हाती शिवबंधन बांधून घेतले. त्यानंतर आता राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपला राजीनामा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ या नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. तसेच शुक्रवारी कालिदास कोळंबकर, चित्रा वाघ आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या बैठकीचा एक फोटोही व्हायरल झाला होता. त्यानंतर त्या भाजपात प्रवेश करतील अशा चर्चांना उधाण आले होते. शुक्रवारी रात्री त्यांनी आपल्या पदाचा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवला. दरम्यान, आपण आपल्या पदाचा राजीनामा सोपवत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच महिलांचा आवाज बनण्याची संधी आपल्याला दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचेदेखील आभार मानले आहेत.