आलिया भट, श्रद्धा कपूर, प्रियांका चोप्रा यांच्यासारख्या आघाडीच्या नायिकांनी पार्श्वगायनात मुशाफिरी केली आणि त्यांना आपल्या गळ्यातील सुरावटींची नव्यानं ओळख झाली. त्यापाठोपाठ नवोदित नायिकाही आता त्याही पार्श्वगायनासाठी पुढे येऊ लागल्या आहेत. हरलीन सेठी हे त्याचे ताजे उदाहरण. ब्रोकन बट ब्युटीफूल या वेबसीरीजच्या दुसऱ्या पर्वातील अभिनयाबाबत हरलीनची सर्वांनीच प्रशंसा केली. आता हरलीन गायनाच्या क्षेत्राचा अनुभव घेणार आहे. याच वेबसीरीजमधील तेरी होगइयां हे गाणे तिने गायले आहे.
याबाबत हरलीन सांगते की, हे गाणे प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच हिट झाले. या गाण्याचे गायक आणि संगीतकार विशाल मिश्रा यांनी आमचे दिग्दर्शक हर्ष देधिया यांना फोन केला तेव्हा मी त्यांच्यासोबत डबिंग करत होते. मी माईकवर हेच गाणे ओरडून गात विशाल यांना सक्सेस पार्टीच्या रात्री मी हेच गाणे गाईन असे सांगितले. त्यांनी सांगितले की माझ्या आवाजात गोडवा आहे. त्याच वेळी माझ्या मनात आले की मी गाण्यासाठी प्रयत्न करावेत. विशाल यांनीही याला होकार दर्शवला. इतकेच नव्हे तर मला मदतही केली आणि माझा उत्साहही वाढवला!