वाघोली : वाघोली (ता. हवेली) येथे 15 जुलै ते 22 जुलै रोजी राबवण्यात आलेल्या ई-निविदा मधील काही कामांच्या बाबतीत स्थानिक शेतकरी व नागरिकांनी आक्षेप घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी पंचायत समिती हवेली, ग्रामपंचायत वाघोली यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
त्यामुळे ई निविदा प्रक्रिया पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली असल्याचे वृत्त दैनिक प्रभातने ३० रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत वाघोली ग्रामपंचायत सरपंच वसुंधरा उबाळे यांनी मासिक सभेत हवेली पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता येंडे यांना स्थानिक तक्रारदार शेतकऱ्यांचे शंकानिरसन करण्यासाठी व योग्य ती कार्यवाही करण्यासाठी बोलावले होते.
त्यानुसार तक्रारदार यांच्यावतीने पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे यांनी शाखा अभियंता यांना वाघोली गावच्या विविध विकासकामांचे अंदाज पत्रक तयार करण्याचा लेखी आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्याला मिळाला आहे का याची विचारणा केली. यावर आदेश नसल्याचे उत्तर संबंधित अधिकारी यांनी दिले. गेल्या वर्षभरापासून शाखा अभियंता येंडे आदेश नसताना अंदाजपत्रक तयार करत होते ते कोणाच्या आशीर्वादाने याबाबत ग्रामपंचायत व ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांच्या वतीने आपण या प्रकरणाचा वस्तुनिष्ठ अहवाल गटविकास अधिकारी यांच्याकडे तातडीने सादर करण्याबाबत पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे यांनी ग्रामपंचायतला सुचवले.
या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. याशिवाय हवेली गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत वादग्रस्त कामांची पाहणी करून त्या कामांबाबत योग्य तो निर्णय घेण्याबाबत तसेच एक वर्षापासून कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेश नसताना देखील वाघोली येथील विविध विकास कामांचे अंदाजपत्रक व मूल्यांकन तयार करणाऱ्या शाखा अभियंता यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.