राज्यात पुढे काय?

होणार अजब तुझे सरकार!
मिथिलेश जोशी
राज्यात भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीला बहुमत दिल्यानंतर 15 दिवसांनतरही सत्तास्थापनेचा दावा करण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ते आता प्रभारी मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. आपला राजीनामा सादर केल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांना सामोरे गेले. पुढील राजकारणाचा वेध त्यांच्या वक्तव्यावरून घेणे सोयीचे होणार आहे.

देवेंद्र फडणवीस राज्यपालांकडे राजीनामा देताना
देवेंद्र फडणवीस राज्यपालांकडे राजीनामा देताना

घटनात्मक तरतुदीनुसार सत्ता स्थापनेचा दावा कोणत्याही पक्षाने न केल्यास राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण देतात. त्यानुसार पुढील सरकार भाजपाच्या नेतृत्वाखाली बनेल, अशा आशावाद आणि विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. त्याचवेळी त्यांनी या अस्थिरतेचे खापर शिवसेनेवर फोडण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेची मुख्यमंत्री पदाचे वाटप आणि सत्तेत समान वाटप असा कोणताही करार झाला नव्हता. माझ्यासमोर अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही अशी कोणतीही चर्चा झाल्याचे अथवा आश्‍वासन दिले नसल्याचे मला सांगितले आहे, असे ते ठामपणे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा

महायुतीला स्पष्ट जनादेश मिळूनही सत्ता स्थापनेत अपयश आल्याबद्दल मला खेद आहे. पण उध्दव ठाकरे यांनी माझा कोणताही फोन उचलला नाही, त्यांनी आमच्याशी चर्चाच थांबिवली. ते कोणत्या तरी मुद्यावर अस्वस्थ असतील, त्यामुळे त्यांना वेळ हवा असेल तर ते समजण्यासारखे आहे. पण त्याचवेळी ते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी दिवासातून तीन चार वेळा चर्चा करत होते, हे दुर्देवी आहे. मुख्यमंत्री पदाबाबत झालेल्या कोणत्याही चर्चेत मी सहभागी नव्हतो. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी त्याबाबत काही चर्चा झाली असेल तर त्याची मला कल्पना नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

या वक्तव्यावरून सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचे निमंत्रण आले तर ते स्वीकारायचे आणि विधानसभेला सामोरे जाण्याचा फडणवीस आणि भाजपाचा मनसुबा स्पष्ट झाला. त्याचवेळी त्यांनी आम्ही फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामागे असणारे कारण म्हणजे, विधानसभा निवडणुकांपुर्वी विरोधक गलितगात्र होते. सध्या तशी स्थिती नाही. त्यामूळे 40 आमदारांचे घाऊक पक्षांतर करणे अशक्‍य आहे. त्याचवेळी दुसरा पर्याय म्हणजे विश्‍वासदर्शक ठरावावर एखाद्या पक्षाला अनुपस्थित ठेवून बहुमत सिध्द करण्यासाठी आवश्‍यक मतांची गरज कमी करणे, सध्या या दोन्ही गोष्टी भाजपाच्या आवाक्‍यात असल्याचे दिसत नाहीत.

फडणवीस आणि ठाकरे

भारतीय जनता पक्षाने कर्नाटकात ऑपरेशन कमळ राबवले. त्याधर्तीवर महाराष्ट्रात राबवण्याची शक्‍यता नाकारता येत नसली. तरी त्यात यश मिळणे कठीण आहे. कारण कर्नाटकात त्यांनी 17 आमदार फोडले. तेथे पोटनिवडणुका लागल्या. त्यावेळी मात्र स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी उचल खात या आमदारांच्या विजयासाठी लढण्यास असमर्थता व्यक्त केल्याची ऑडीओ क्‍लिप व्हायरल होत आहे. तसेच राज्यात भाजपात गेलेल्या 19 नेत्यांना पराभवाचा धक्का पचवावा लागला हे कटू वास्तवही आमदारांच्या लक्षात असेल. मोदी लाटेचा कोणताही प्रभाव या निवडणुकांत दिसला नाही. त्यामुळे विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जात स्व. अटलबिहारी वाजपेयींसारखे भावपूर्ण भाषण करत सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, असे मानण्यास वाव आहे.

उध्द्धव ठाकरे
उध्द्धव ठाकरे

शिवसेनेची आजवरची भूमिका पाहता ते या भूमिकेपासून मागे हटण्याची शक्‍यता नाही. तसे केल्यास शिवसेनेची ती राजकीय आत्महत्या ठरेल. भूमिकेपासून दूर होणाऱ्या कोणत्याही पक्षाला या महाराष्ट्रात स्थान उरत नाही, हा इतिहास आहे. त्यामूळे भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा न केल्यास शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करावा लागेल. त्यावेळी बहुमत असल्याचा विश्‍वास राज्यपालांना द्यावा लागेल. तो मिळेल का? हे पाहण्यासाठी राज्यातील सरकारबाबत केद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांना शरद पवार यांनी खास त्यांच्या शैलीत या प्रश्‍नाचे उत्तर दिले. मी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना तुम्हीच दोन्ही पक्षांना एकत्र आणू शकता. त्यादृष्टीने प्रयत्न करा, असे सुचवले आहे. याचा अर्थ युतीतील दोन्ही पक्षातील बेबनावाकडे त्यांचे बारीक लक्ष आहे. त्यातून सत्तेची संजिवनी पक्षाला देता आली तर ती त्यांना हवीच आहे. त्यामुळे शिवसेना सरकार स्थापन करू शकणार नाही, हा भ्रम ठरण्याची शक्‍यता अधिक आहे. पाहु या घोडा मैदान जवळ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.