मंचर पोलीसांकडून तपास सुरू
मंचर- आंबेगाव तालुक्यातील जवळे येथील शिंदे मळ्यातील चार बंद घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त करुन चोरी केल्याची घटना शुक्रवारी (दि.8) पहाटे घडली. घरे बंद असून घराचे मालक बाहेरगावी राहत असल्याने घरातून नक्की काय चोरीला गेले याबाबत माहिती मिळालेली नाही. मंचर पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली आहे.
शिंदेमळा येथील डॉ.प्रकाश रामभाऊ शिंदे (सध्या रा. मंचर), राजेश बबन शिंदे (सध्या रा. मुंबई), मारुती सदू शिंदे (सध्या रा. अवसरी खुर्द). एकनाथ पिराजी शिंदे यांच्या बंद असलेल्या घरांची कुलपे तोडून आतमध्ये प्रवेश करुन घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करुन किरकोळ चोरी केली आहे. दरम्यान चोरीची माहिती ग्रामस्थांनी मंचर पोलिसांना कळविली असता पोलीस कर्मचारी कैलास कड, चंद्रकांत वाघ यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलीस कर्मचारी नवनाथ नाईकडे, पोलीस पाटील रविंद्र लोखंडे यांनी पंचनामा केला असून पुढील तपास मंचर पोलीस करीत आहेत. चोरट्यांनी चोरी करण्याअगोदर बंद घरांच्या शेजारील घराच्या कड्या बाहेरुन लावल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. भुरट्या चोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.