शिवसेना-भाजपचं सरकार येण्याच्या आशा धुसर- जयंत पाटील

भाजपाचे अपयश पुन्हा एकदा सिद्ध झाले

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या ५ वर्षांच्या युतीच्या कार्यकाळात महाराष्ट्र पिछाडीवर गेला आहे. दरम्यानच्या काळात अनेक प्रश्न उपस्थित झाले. मात्र, या प्रश्नांची उकल करण्यात भाजपाला अपयश आल्यामुळेच त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत १०५ जागांवर समाधान मानावं लागलं, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

युती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. ५ वर्षांत युती सरकारने राज्यातील जनतेला न्याय दिलेला नाही. वेळप्रसंगी शिवसेनेने विरोधी पक्षांप्रमाणे भूमिका बजावली असल्याची शिवसेनेने कबूली दिलेली आहे. त्यामुळे यावेळी महाराष्ट्रातल्या जनतेने पुन्हा एकदा युती सरकारला सोडून इतर पक्षांना जास्त मतदान केल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच महाराष्ट्राला चांगलं प्रशासन देऊ शकतो, याची जनतेला खात्री असल्याचे जयंत पाटील यांनी केले.

तसेच आज मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेना-भाजप युतीचं सरकार येण्याच्या आशा धुसर झाल्या शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकांचा पक्ष असल्याने राज्यपाल शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रीत करण्याची शक्यता आहे. या दोन्हीं पक्षांनी सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा करायला हवी होती. मात्र, भाजपाला सरकार स्थापन करण्यात अपयश आले. भविष्यकाळात काय होईल हे योग्य वेळ आल्यावरच तेव्हा कळेल. मात्र, भाजपाचे अपयश याठिकाणी पुन्हा एकदा अधोरेखीत झाले, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.