लंडन – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील 1.2 अब्ज नागरिकांना ग्रासले आहे. सुमारे 200 देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत 60 हजार रुग्ण दगावले आहेत. अमेरिकेपासून जपानपर्यंत कित्येक देशांमध्ये लॉकडाऊन, टोटल शटडाऊन, हाऊस क्वारंटाईनसारख्या उपाय योजना केल्या जात आहेत. मात्र अजूनही असे कितीतरी देश आहेत, जिथे कोरोनाचा संसर्ग अजूनही झालेला नाही.
प्रशांत महासागरातील छोट्या छोट्या बेटांवरच्या देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग अद्याप झालेला नाही. मुख्य भूमीपासून दूर समुद्रामध्ये असल्याचा फायदा या देशांना झाला आहे. त्यातच जगभर लागू असलेल्या प्रवास बंदीमुळे त्या देशांमध्ये इतर कोणत्याही देशातील कोरोना बाधित रुग्ण जाऊच शकलेले नाहीत. त्यामुळेही तेथे अद्याप कोणताही संसर्ग झालेला नाही. सोलमन आयलंड, वनातू, समोआ, किरीबाती, मायक्रोनेशिया, टोंगा, द मार्शल आयलंड पलाउ, तुवालु आणि नौरु यासारख्या देशांमध्ये “कोविड-19′ रोगाची अद्याप लागण झालेली नाही.
चीनच्या अगदी शेजारी असलेल्या उत्तर कोरिया, येमेन, तुर्कमेनिस्तान आणि ताजिकीस्तान या आशिया खंडातील देशांमध्येही अद्याप कोरोनाचे रुग्ण आढळलेले नाहीत. आपल्या देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, असा दावा जेंव्हा उत्तर कोरियाने केला तेंव्हा आंतरराष्ट्रीय तज्ञांना आश्चर्यच वाटले होते.
चीनमध्ये कोरोनाचे 80 हजार रुग्ण असून 3 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजे 2 लाख इतकी आहे.