प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 2 -कोट्यवधी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या पीएमपीच्या महिला कर्मचारी आणि प्रवाशांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. ही सुविधा नसल्याने महिलांची कुचंबणा होत आहे, याची जाणीव प्रशासनाला पुन्हा एकदा झाली आहे. दरम्यान, या प्रमुख थांबे आणि स्थानकांवर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारून द्यावे, असे म्हणत 22 स्थानकांची यादी पीएमपीने पालिकेला दिली आहे. पीएमपीकडे 11 हजारांपैकी 413 महिला कर्मचारी असून, त्यात सुमारे 219 जणी वाहक आहेत.
याशिवाय दररोज सुमारे चार लाख महिला प्रवासीही असतात. अनेकदा या प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत रहावे लागते. अशा वेळी त्यांना जवळपास 22 बस स्थानकांवर कुठेही स्वच्छतागृह नाही. परिणामी, महिला कर्मचाऱ्यांसह प्रवाशी महिलांनाही आसपासची हॉटेल अथवा सार्वजनिक स्वच्छतागृहे सापडेपर्यंत वाट पाहावी लागते. त्याचा त्यांच्या आरोग्यावरही दृष्परिणाम होत आहे. त्यामुळे पालिकेने या ठिकाणी फिरते अथवा कायमस्वरुपी स्वच्छतागृहे उभारावीत, अशी मागणी पीएमपीने केली आहे.
पीएमपीने दिल्या होत्या जुन्या बस
स्मार्ट सिटीच्या नावाखाली अवघ्या काही वर्षांपूर्वी शहरात पीएमपीच्या बसच्या रचनेत बदल करून “ती’ स्वच्छतागृहे उभारण्यात आली होती, त्याच पीएमपीला आता स्वच्छतागृहांसाठी पालिकेवर विसंबून राहण्याची वेळ आली आहे.
या प्रमुख बसथांब्यांवर असावे स्वच्छतागृह
सनसिटी, भेकराईनगर, वाघोली, नेहरू स्टेडियम, केशवनगर (मुंढवा), शेवाळवाडी, वारजे-माळवाडी, डेंगळेपूल, मंडई, सारसबाग, कुंबरेपार्क, तळजाईपठार, भारती विद्यापीठ, कॉंग्रेस भवन, धायरी (मारुती मंदिर), मोलीदिना हॉल, ससून रस्ता, कात्रज-प्राणीसंग्रहालय, खराडी, सुतारवाडी, कात्रज-बीआरटी, विश्रांतवाडी.