पुणे पालिका अॅक्‍शनमोडमध्ये; पाच दिवसांत सुमारे दीड लाख रुपये दंड वसूल

सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या 568 जणांवर कारवाई


यामध्ये मॉल्स, हॉटेल्स, विना मास्क, बार, शॉप्स यांचा समावेश; सुमारे दीड लाख रुपये दंड वसूल

पुणे – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने धडाकेबाज कारवाई सुरू केली असून, गेल्या पाच दिवसांत 1 लाख 55 हजार 50 रुपये दंड वसूल केला आहे. कारवाईमध्ये मंगलकार्यालये, मॉल्स, बार, शॉप, विनामास्क फिरणारे वाहनचालक आणि पादचारी आदींचा समावेश आहे. महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा नाईक यांनी ही माहिती दिली.

मास्क न वापरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत तर आस्थापनांमध्ये थेट इन्स्पेक्‍शन करत महापालिका कारवाई करत आहे. त्यासाठी महापालिकेने आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा नाईक आणि डॉ. कल्पना बळीवंत यांना नोडल ऑफिसर म्हणून नेमले आहे. 17 फेब्रुवारीपासून या कारवाईला सुरुवात केली आहे.

17 ते 21 फेब्रुवारीपर्यंत महापालिकेने 826 ठिकाणी इन्स्पेक्‍शन केले, त्यात 568 ठिकाणी त्यांना सुरक्षेचे नियम पाळले नसल्याचे दृष्टोत्पत्तीला आले. त्यात जिमखाना, नाईट क्‍लब, मंगल कार्यालये अशा 58 जणांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय तब्बल 47 हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली असून, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त क्षमतेने हॉटेल्स चालवणे, हॉटेलमध्ये सुरक्षेचे नियम न पाळणे, वेटर्स आणि अन्य कर्मचारी विना मास्क अशा वेगवेगळ्या त्रुटी याठिकाणी आढळून आल्या.

गेल्या चार दिवसात कॅफे गुडलक, हॉटेल रूपाली, वैशाली यांच्यावर कारवाई करण्यात आली. प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय पाच सिनेमाहॉल्स, 52 शॉपिंग मॉल्स, रिटेल आऊटलेटस आणि अन्य 69 ठिकाणी कारवाई करण्यात आली.

याशिवाय 272 वेगवेगळ्या स्पॉटवर सुरक्षेचे नियम पाळत नसल्याचे दिसून आल्याने कारवाई करण्यात आली. या कारवाईत 1 लाख 51 हजार 950 रुपये दंड वसूल करण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.