-->

कस व्हायचं आमचं ?; लॉकडाऊनच्या चिंतेने शेतकरी ग्रासला

जिल्ह्यातील शेतीमालाची काढणी होण्यापूर्वीच संसर्ग वाढला : साठेबाजीला खतपाणी?

प्रा. सुरेंद्र शिरसट
भिगवण :
जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्याने शेतकरी पुन्हा धास्तावला आहे. गेल्यावर्षी प्रमाणे लॉकडाऊन होऊन शेतामाल विक्रीअभावी खराब होईल, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. लॉकडाऊन होईल या अफवेने शेतकरी धास्तावला आहे. नगदी पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना याची सर्वांत मोठी आर्थिक झळ बसणार आहे. तसेच जिल्ह्यात साठेबाजीला खतपाणी मिळण्याची शक्‍यता आहे. व्यापाऱ्यांनी आतापासून जीवनावश्‍यक वस्तूंचा साठा सुरू केल्याची चर्चा आहे.

गेल्यावर्षी देशभरात लॉकडाऊन झाल्यानंतर शेतीमाल खराब झाला होता. इंदापूर तालुक्‍यात तरकारी, भाजीपाला, फुलशेतीला जबर तडाखा बसला होता. ऐन लग्न सराईच्या कालावधीत लॉकडाऊन झाल्यामुळे विवाह सोहळे, अन्य समारंभ रद्द झाले होते. त्यामुळे फूलशेतीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला होता. सलग तीन महिन्यांच्या विवाह सोहळ्यात नीरव शांतता पसरली होती. इंदापूर तालुक्‍यातील द्राक्ष हंगाम ऐन बहरात असताना विक्रीला ब्रेक लागला होता. डाळींब, मासळी बाजाराला फटका बसला होता. या तीन महिन्यांच्या कालावधीत वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असलेला घटक आर्थिक झळीत होरपळून गेला होता. कष्टकरी जनतेचे प्रचंड हाल झाले.

गेल्यावर्षी जुलैनंतर करोनाची साथ संथगतीने आटोक्‍यात आली. त्यानंतर दसरा, दिवाळीनंतर करोनाचा संसर्ग कमी झाला. नवीन वर्षांत करोनाची स्थिती आटोक्‍यात आल्यानंतर त्याचवेळी लसीकरणास सुरूवात झाली आहे. त्यातच करोनाचा संसर्ग आणखी वाढला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात याचा फटका सर्वाधिक बसत आहे. राज्यातील सर्वांत हॉटस्पॉट जिल्हा म्हणून पुणे जिल्ह्याचे नाव टॉपवर आहे. सोमवार (दि. 22) पासून जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यात विवाह सोहळे, अन्य कार्यक्रमांवर गदा आली आहे. त्याचा परिणाम अर्थकारणावर होत आहे. त्यामुळे फुलेशेतीवर अर्थकारण असलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे.

अतिवृष्टीनंतर आता लॉकडाऊनची चिंता
जिल्ह्यात रब्बी हंगामातील क्षेत्र हे सरासरी एक लाख एकरांवर आहे. त्यातच वर्षभराची पुंजी याच हंगामावर चालत असते. खरीप हंगाम अतिवृष्टीने वाया गेल्यानंतर रब्बी हंगामातील पिक हातातोंडाशी आलेले होते. मात्र, यावरही लॉकडाऊनची टांगती तलवार लटकत आहे. सध्या रब्बीतील काढणी हंगाम तोंडावर आला आहे. गहू, हरभरा, ज्वारीची काढणी सुरू होणार आहे. गेल्यावर्षीसारखी आपली अवस्था होईल का, या चिंतेने अर्थकारणावर बाधा पोहोचण्याची शक्‍यता आहे.

साठेबाजीला निमंत्रण मिळणार?
काही व्यापारी लॉकडाऊन होणार अशी चर्चा पसरून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. यामुळे शेतातील आलेला शेतीमाल अल्प दराने खरेदी करून व्यापारी त्याची विक्री करीत आहेत. द्राक्षे, पेरू, कलींगड, कोथिंबीर, मेथी, टोमॅटो, कांदे, गहू, ज्वारी आदी पिके व पालेभाज्या अत्यल्प दरात खरेदी करून व्यापारी चढ्या दराने विकत आहेत. शेतकरी आर्थिक झळ सोसून शेतीमाल कमी दराने का होईना पण बाजारात विकण्याचा प्रयत्न करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.