दिवसभरात नव्याने 472 करोनाबाधित रुग्ण सापडले
पुणे – करोना विषाणूच्या नमुने तपासणीची संख्या वाढताच अवघ्या तीन दिवसात बाधितांची संख्या तब्बल 1 हजार 200ने वाढत 11 हजाराचा टप्पा पार केला आहे. आज नव्याने शहरात 472 बाधित सापडले आहेत. तर सहा बाधितांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 193 जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
शहरात काल तब्बल 2 हजार 841 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली. त्यातील जवळपास दोन हजाराहून अधिक नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यामध्ये 472 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आज नव्याने आणखी 2 हजार 464 जणांची नमुने घेण्यात आले असून पुढील 24 तासात त्याचा अहवाल प्राप्त होईल.
दरम्यान, सद्यःस्थितीत शहरात 3 हजार 722 व्यक्तीवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामध्ये नायडू आणि त्याअंतर्गत असलेल्या रुग्णालयात 2 हजार 625 बाधितांवर उपचार सुरू आहेत. ससून रुग्णालयात 124 तर खासगी रुग्णालयात 973 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 245 बाधितांची प्रकृती चिंताजनक आहे.