जूनमधील 18 दिवसांत करोनाबाधितांच्या संख्येत पावणे दोन लाखांची भर

नवी दिल्ली -देशात बुधवार सकाळपासून 24 तासांत तब्बल 12 हजार 881 नवे करोनाबाधित आढळले. तो एकाच दिवसातील उच्चांक ठरला. देशात सलग 7 व्या दिवशी 10 हजाराहून अधिक बाधितांची नोंद झाली. त्या वाढत्या संख्येमुळे जूनमधील 18 दिवसांत देशातील करोनाबाधितांमध्ये 1 लाख 76 हजार 411 इतक्‍या संख्येची भर पडली.

देशात सर्वांधिक करोनाबाधित आणि बळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. बाधित संख्येत देशात दुसऱ्या क्रमाकांवर असणाऱ्या तामीळनाडूने याआधीच 50 हजारांचा टप्पा पार केला आहे. बाधितांची वेगाने वाढणारी संख्या पाहता दिल्लीही तामीळनाडूपाठोपाठ तो टप्पा ओलांडण्याची शक्‍यता आहे. गुजरातमध्ये बुधवारीच बाधितांची संख्या 25 हजारांपेक्षा अधिक झाली. बाधित संख्या वेगाने वाढत असतानाच बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देशासाठी दिलासादायक ठरत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात सध्या 1 लाख 60 हजारपेक्षा अधिक सक्रिय बाधित आहेत. तर करोनामुक्त झालेल्या बाधितांची संख्या 1 लाख 95 हजारच्या घरात आहे. देशातील बाधित बरे होण्याचे प्रमाण 53 टक्‍क्‍यांजवळ पोहचले आहे.

महाराष्ट्र, दिल्लीमुळे मृत्यूदरातही वाढ

करोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या आकडेवारीत महाराष्ट्र आणि दिल्लीने सुधारणा केली. याआधी नोंद न झालेल्या मृतांचा समावेश त्या राज्यांनी आकडेवारीत केला. त्यामुळे बुधवारी देशात एकाच दिवसातील उच्चांकी 2 हजार करोनाबळींची नोंद झाली. त्यापाठोपाठ गुरूवारी बळींच्या संख्येत 334 ची भर पडली. संबंधित दोन दिवसांतील बळींच्या संख्येमुळे देशातील करोना मृत्यूदर 2.8 टक्‍क्‍यांवरून वाढून 3.3 टक्के इतका झाला.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.