गेल्या दहा दिवसांमध्ये झाली करोनाबाधित रुग्णांची वाढ
एकाच दिवशी 425 करोनाबाधित : रिकव्हरी रेट झाला कमी
पिंपरी – करोनाचे रुग्ण वाढत असल्याची भीती व्यक्त होत असतानाच पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी करोनाबाधितांच्या संख्येत खूप मोठी वाढ पहावयास मिळाली. एकाच दिवसात करोनाचे 425 रुग्ण आढळले असून हा आकडा 2021 मधील उच्चांकी आकडा आहे. गेल्या दोन महिन्यामध्ये करोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र आठ दिवसांपासून रुग्णसंख्येचा आलेख वाढला असून बुधवारी नवीन वर्षातील उच्चांक गाठला आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये 425 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरामध्ये 440 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 1 लाख 4 हजार 50 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. शहराबाहेरील एकाही रुग्णाची आज नोंद झाली नाही. तसेच आज दिवसभरामध्ये शहरातील चिखली येथील एका 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.
आजपर्यंत 2605 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1833 तर शहराबाहेरील 772 इतक्या रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे करोनाबाधित रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाण देखील घटले आहे. मागील दहा दिवसांमध्ये बरे होण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये तब्बल 2319 रुग्णांना लागण झाली आहे. तर अवघ्या 1115 रुग्णांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानुसार करोनाबाधित रुग्णांचा रिकव्हरी रेट 48 टक्के इतका झाला आहे.
आज दिवसभरात 440 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 99 हजार 53 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 1856 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अद्याप 637 रुग्णांचा अहवाल प्रलंबित आहे.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 737 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 2427 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 3164 इतकी आहे.
मृत्यूचे प्रमाण कमी असल्याने दिलासा
शहरातील रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यू रोखण्यामध्ये प्रशासनाला यश आले आहे. रुग्णांच्या प्रमाणामध्ये मृत्यू प्रमाण नगण्य आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये 2 हजार 319 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार मृत्यूचा दर हा 0. 30 टक्के इतका आहे.
“ड’ प्रभाग करोनाचा हॉटस्पॉट
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमधील ड प्रभागामध्ये आज सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. या प्रभागामध्ये 24 तासांत 100 नवीन रुग्ण आढळले आहेत. महापालिकेच्या ड प्रभागाच्या हद्दीमध्ये पिंपळे गुरव, पिंपळे निलख, पिंपळो सौदागर, कल्पतरु इस्टेट, विशालनगर, पुनावळे या भागांचा समावेश होतो. या भागामध्ये उच्चभ्रू नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. याच भागामध्ये आज करोनाचे सर्वाधिक 100 रुग्ण आढलले आहेत. तर त्याखालोखाल ब प्रभागामध्ये 62, फ प्रभागामध्ये 52 रुग्ण आढळले आहेत. तसेच अ प्रभाग 41, क 48, इ 44, ग 49, व ह प्रभागामध्ये सर्वात कमी 29 रुग्णांची नोंद झाली आहे.