मुंबई – राज्यासह मुंबईत काही दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यातच मुंबईत मुसळधार पावसामुळे बोरिवलीतील मागाठाणे मेट्रो स्टेशन परिसरातील जागा पुन्हा खचली असल्याचा प्रकार घडला आहे.
बोरिवलीतील मागाठाणे मेट्रो स्टेशनजवळ भूस्खलनाचा दुसरा प्रकार बुधवारी (28 जून) घडला. पाऊस पडत असताना त्याचवेळी मेट्रो स्टेशनजवळ खोदलेल्या खड्ड्यात मेट्रो स्टेशनच्या पायऱ्यांजवळचा काही भाग खचला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
थेट मेट्रो स्टेशन लगतची जागा खचल्याने या घटनेवर चिंता व्यक्त केली जात आहे. त्यात थेट मेट्रो स्टेशनला लागूनच असलेली जमीन खचल्यामुळे मेट्रो स्टेशनही खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घटनेकडे गांभीर्याने बघण्याची जास्त आवश्यकता आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मेट्रो स्टेशनलगतच्या जमिनीला कोटिंग न केल्यामुळे आणि काही इतर कारणास्तव जमीन खचली. यामुळे मेट्रो स्टेशनच्या पायात याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी मेट्रो परिरसरात पाहणी करताना केली.