बॉलिवूड सेलेब्स सध्या लॉकडाऊनच्या काळात आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. बॉलिवूडमधील हिट जोडींपैकी अजय देवगण आणि काजोल यांची एक जोडी आहे. या दोघांच्या लग्नाला 21 वर्षे झाली आहते. अलीकडेच या दोघांनी 11 वर्षांनंतर “तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात एकत्रित स्क्रीन शेअर केली होती. हा चित्रपट जबरदस्त हिट झाला होता.
दरम्यान, काजोल आणि अजय हे सोशल मीडियावर एकमेकांची खिल्ली उडवित असतात. अलीकडे असेच काहीतरी पुन्हा पाहिले गेले आहे. अजय देवगनने नुकताच काजोलसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. काजोलसोबत अजयचा हा फोटो 22 वर्षांपूर्वीचा आहे. फोटो शेअर करताना अजयने एक मजेदार कॅप्शन लिहिले आहे, त्याने लिहिले आहे- “हे बघून असे दिसते की लॉकडाऊन सुरू होऊन 22 वर्षे झाली आहेत.’
या फोटोपेक्षा त्याच्या कॅप्शनवर अधिक चर्चा होत आहे. सध्या देशव्यापी लॉकडाऊनला सुमारे दोन महिने होत आहेत; परंतु अजयला वाटते की तो 22 वर्षांपासून लॉकडाऊनमध्ये आहे. वास्तविक, त्यांच्या लग्नाला 21 वर्षे पूर्ण झाली असून 22वे वर्ष सुरू आहे. हे जोडपे 24 फेब्रुवारी 1999 रोजी विवाहबंधनात अडकले होते.