– रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – खेड तालुक्यात २४ तासात २७ व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. तर१९ व्यक्तींनी करोनावर विजय मिळवला आहे. या करोना मुक्त रुग्णांना म्हाळुंगे येथील कोविड केअर सेंटरमधून मंगळवारी घरी सोडण्यात आले. यावेळी तालुका प्रशासन आणि कोविड केंद्रातील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून टाळया वाजवत त्यांना निरोप दिला.
खेड तालुक्यात करोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तालुक्यात २४ तासात २७ व्यक्ती करोना बाधित सापडल्या आहेत. तालुक्यात दिवसेंदिवस बाधित व्यक्तीच्या संख्येत भर पडत असल्याने चिंतेचा विषय बनला आहे. खेड तालुक्यातील जवळपास ४० गावांसह राजगुरूनगर, आळंदी आणि चाकण नगर परिषदांमध्ये एकूण २७८ व्यक्ती आतापर्यंत करोनाबाधित झाल्या आहेत. तर खेड तालुक्यातील २७८ करोना बाधित व्यक्तींपैकी ८५ व्यक्ती बऱ्या झाल्या आहेत.
म्हाळुंगे येथील कोविड केअर सेंटरमधून करोनामुक्त झालेल्या १९ व्यक्तींना घरी सोडण्यात आले. यावेळी खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश गोरे, भगवान पोखरकर, कोव्हीड केअर सेंटर मधील डॉक्टर, नर्सेस उपस्थित होते.
खेड तालुक्यात जशी करोना बाधित व्यक्तींच्या संख्येत वाढ होत आहे. त्याच प्रमाणात करोना मुक्त रुग्णांचीही संख्या वाढत आहे. दरम्यान तालुक्यात आठ दिवसात झपाट्याने वाढलेल्या करोना बाधित व्यक्तीमुळे तालुक्यात आठ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले असून करोनाची साखळी तुटणार कि अजून विळखा घालणार हेच पाहावे लागेल.
– अंकुश राक्षे, खेड पं.स.सभापती