जुन्नर -जुन्नर तालुक्यात शनिवारी (दि. 31) एकाच दिवसात 25 रुग्ण आढळून आल्याने करोनाबाधितांची संख्या 451 इतकी झाली आहे. आठ दिवसांपासून बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होते. मात्र, शनिवारी वडगाव कांदळी (8), शिंदे (6), नारायणगाव (3), तेजुर (2) तर पारुंडे, येडगाव, ओतूर, आळे, सांगणोरे आणि उंचखडक या गावांत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
त्यामुळे यापुढे लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल झाले तरीही नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे भान बाळगावे, अन्यथा पुन्हा रुग्णांची संख्या वाढू शकते, असा इशारा वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश गोडे यांनी दिला आहे.
तालुक्यातील 451 रुग्णांपैकी 307 व्यक्ती उपचारानंतर बरे होऊन घरी पोहचले आहेत. तर 127 ऍक्टिव्ह रुग्णांवर लेण्याद्री, नारायणगाव व पुणे येथे उपचार सुरू आहेत. त्यातील 106 व्यक्ती ग्रामीण भागातील व 21 शहरी भागांतील असून आजअखेर 17 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. बाधित रुग्णांपेक्षा जवळपास तिप्पट रुग्ण बरे झाल्याचे दिलासादायक चित्र आहे.